पुणे- पुण्यात एका दुर्दैवी अपघातात एका २१ वर्षीय शॉर्ट फिल्म दिग्दर्शकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटजवळ सोमवारी १७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी घडली.
रिद्धेश विनय शिंदे (वय २१, रा. दापोडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रिद्धेश हा एक तरुण आणि उदयोन्मुख लघु चित्रपट दिग्दर्शक होता. त्याने नुकतीच त्याची बीएससी (BSc) पदवी पूर्ण केली होती.
रिद्धेश त्याच्या शॉर्ट फिल्मच्या कामासाठी पुण्याला दुचाकीवरून गेला होता. काम संपवून रात्रीच्या वेळी घरी परतत असताना, एका भरधाव पीएमपीएमएल बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्ता दुभाजकाच्या खांबाला जाऊन धडकला. तो गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी आणि बस वाहकाने तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या प्रकरणी रिद्धेशचे वडील विनय शिंदे (वय ४५) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून खडकी पोलीस ठाण्यात संबंधित पीएमपीएमएल बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
