ब्रेकिंग न्यूज

तृतीयपंथीय असल्याचे भासवून घरात घुसून महिलेवर अत्याचार, अवघ्या काही तासांत आरोपीला अटक

Share

मुंबई- साडी नेसून तृतीयपंथी असल्याचं भासवून एका तरुणाने पवई परिसरात एका घरात घुसून महिलेसोबत अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली. आजारी पतीला बरे करण्याच्या आणि घरावरची वाईट नजर उतरवण्याच्या बहाण्याने तो घरात घुसला. महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपीला अवघ्या काही तासात जेरबंद केले.

अनिल शिंदे (30) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला ठाण्यातील खारेगाव परिसरातून अटक केली.

याबाबतची माहिती अशी की पीडित महिला पवईतील एका गृहनिर्माण संस्थेत राहते. लग्न होऊन पाच वर्षे झाली, परंतु अद्यापही मूल होत नाही, या विवंचनेत हे कुटुंबीय होतं. बुधवारी १९ ऑगस्ट रोजी पीडित महिलेचे पती कामावर गेलेले असताना ही महिला आपल्या सासूसोबत घरात एकटीच होती. त्यावेळी आरोपी शिंदे हा तृतीयपंथी असल्याचं सांगून त्यांच्या दारावर आला. वृद्ध नातेवाईकानं दरवाजा उघडल्यावर अनिल शिंदेनं त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देण्याचे नाटक केलं. त्यावेळी या वृद्ध महिलेनं बोलता बोलता आरोपी शिंदेला आपल्या सुनेची व्यथा सांगितली. हीच संधी साधून शिंदेनं मूल होण्यासाठी विशेष विधी करून देण्याची तयारी दर्शवत त्यांच्या घरात प्रवेश मिळवला.

घरात आल्यावर आरोपी थेट महिलेच्या बेडरूममध्ये गेला, तिथं काही वेळ संवाद साधत आणि तिला पलंगावर झोपण्यास सांगितलं. त्यानंतर विधी करण्याच्या बहाण्यानं त्याने अयोग्य पद्धतीनं तिला स्पर्श करत जिवे मारण्याची व शारीरिक इजा करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. जाताना आरोपीने “तुला लवकरच मूल होईल” असा आशीर्वाद दिला आणि पैशांची मागणी केली. तेव्हा महिलेनं त्याला घरातील २००० रुपये दिले ते घेत आरोपी तिथून बाहेर पडला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने आपल्या पतीला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. संध्याकाळी दोघांनी पवई पोलीस ठाण्यात या घटनेची रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ इमारत आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यात एका फुटेजमध्ये आरोपी रिक्षातून जाताना दिसला. पोलिसांनी रिक्षाच्या नंबरप्लेटवरून रिक्षाचालकाचा त्वरित शोध घेत त्याच्याकडे चौकशी केली. चालकाने दिलेल्या माहितीच्या आधारावर आरोपी कळवा येथील खारेगाव परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्वरित पोलिसांनी कळवा भागात धाड टाकून बुधवारी रात्री आरोपी अनिल शिंदेच्या मुसक्या आवळल्या. चौकशी करताच तो तृतीयपंथी नसून एक पुरुष असल्याचे निष्पन्न झाले.