सातारा- पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट मार्गातील खंडाळा येथील जुना टोलनाका उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने आजपासून एक लेन वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी ही वाहतूक सेवा रस्त्यावर वळविण्यात आली होती. नवीन बोगदा सुरू झाल्यावर सात महिन्यांनंतर ही एक लेन वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहन चालकांना विनाअडथळा मार्गक्रमण करता येणार आहे.
नवीन बोगदा सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या 7 महिन्यांपासून या भागातील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली होती. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी आणि वाहतुकीचा खोळंबा होत होता. खंडाळा जुन्या टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा चाचणी घेऊन पुणे बाजूकडील मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी कमी होणार असून प्रवास विनाअडथळा आणि जलद होणार आहे.
खंबाटकी घाटातील बोगद्यातून खंडाळा गावापर्यंतचा पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्याने सातारा-पुणे प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. तसेच खंबाटकी घाटातील जुनी धोकादायक वळणे आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे संभाव्य अपघातापासून देखील वाहनधारकांची सुटका झाली आहे.
