पुणे- बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर प्लास्टरचे काम सुरु असताना तोल जाऊन खाली पडल्यामुळे दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना पुण्यात वडगाव बुद्रुक येथे घडली. या प्रकरणी ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजयकुमार छन्नु खुटेल (वय ३६ रा. छत्तीसगड) आणि नारायण परदेशी वर्मा ( वय ३४ रा. छत्तीसगड) अशी मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची नावे आहेत.
सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक येथे त्रिदल समृद्धी साईटवर इमारतीचे बांधकाम सुरु आहे. ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ च्या सुमारास चौथ्या मजल्यावर प्लास्टरचे काम सुरु असताना संजयकुमार आणि नारायण तोल जाऊन खाली पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना दोघान्चा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पोलिसांनी ठेकेदाराच्या विरोधात कामगारांच्या जीवासह सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न केल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी पुढील तपास करीत आहेत.
