ब्रेकिंग न्यूज

पुणे रेल्वे स्टेशनवर लूटमार, रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला करून ५ लाखांचा ऐवज लुटला

Share

पुणे- पुणे रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीजवळ एका रेल्वे कर्मचाऱ्यावर दोघा अज्ञात व्यक्तींनी चाकूने वार करून, हात-पाय बांधून व तोंडात रुमाल कोंबून रोख रक्कम, सोन्याची साखळी व दोन मोबाईल असा एकूण ४,९१,६२५ रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १८) मध्यरात्री १ च्या सुमारास घडली.

केल्विन सोलोमन मायला (वय २९, रा. धायरकर कॉलोनी मुंढवा ) असे या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव असून या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्र्यादी केल्विन हे पुणे रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस म्हणून कार्यरत आहेत. रात्रीच्या वेळी तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांकडून वसूल केलेली दंड आणि तिकीटाची रक्कम कार्यालयात जमा करण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांना गाठले. गळ्याला चाकू लावून मारहाण केली आणि झटापटीत उजव्या हातावर वार केले. लुटमार केल्यानंतर त्यांचे हात-पाय बांधून व तोंडात रुमाल कोंबून आरोपी पसार झाले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.