ब्रेकिंग न्यूज

२२ लाखांच्या अमली पदार्थांसह राजस्थानातील दोघेजण गजाआड, मलठणमध्ये मध्यरात्री झाली कारवाई

Share

पुणे- शिरूर तालुक्यातील मलठणगावच्या हद्दीमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दुचाकीसह २२ लाख रुपये किमतीचे ११० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहेत.

सुरेंदसिंह भैरुसिंह राठोड उर्फ राजपुत (वय २४) आणि श्रवण तेजाराम बिष्णोई (वय ३१), (दोघेही मूळ राहणार राजस्थान सध्या मलठण) आरोपींच्या विरोधात ‘एनडीपीएस’ कायद्याच्या कलम ८(क) आणि २२ अंतर्गत कायदेशीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे आरोपी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ नेमके कुठून घेऊन आले होते, त्यांना हा एमडीचा साठा कोणी पुरवला होता आणि शिरूर परिसरामध्ये ते याची विक्री कोणाला करणार होते, याचा सखोल तपास आता पोलिसांकडून तातडीने सुरू करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या पथकाला त्यांच्या खबऱ्याकडून मलठण परिसरात दोन व्यक्ती मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. ती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कोणताही वेळ न दवडता मलठण राजवाडा चौकात सापळा रचला.

पोलिसांनी हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. मलठण परिसरात काही संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन व्यक्ती पोलिसांच्या निदर्शनास आल्या आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे ५१ ग्रॅम वजनाचा लालसर काळपट रंगाचा पदार्थ आणि ५७.५ ग्रॅम वजनाचा पंधरा, पिवळसर रंगाचे मेफेड्रोन आढळून आले. शिरूर पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक नितीन केनेकर पुढील तपास करीत आहेत.