ब्रेकिंग न्यूज

पान मसालाची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटीना होऊ शकतो १० लाखांचा दंड, शिवाय…..

Share

मुंबई- सरोगेट जाहिराती केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बॉलिवूड सेलिब्रिटींना नोटीस बजावली असून, दोषी आढळल्यास १० लाख रुपयांपर्यंतच्या दंड होऊ शकतो असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे. बॉलिवूडचे दिग्ग्ज अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण, आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यामुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. राज्यात बंदी असलेल्या पान मसाल्याचा अप्रत्यक्ष प्रचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

तिन्ही कलाकारांनी २०२४ मध्ये विमल या पान मसाला कंपनीच्या ‘विमल इलायची’ जाहिरात कँम्पेनमध्ये एकत्र काम केले होते. या प्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. या अभिनेत्यांना नोटिशीचे उत्तर देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली असून, सोशल मीडियावरून संबंधित जाहिरातींचे साहित्य तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्रात पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री यावर बंदी आहे. मात्र तरीही पान मसाल्याची विक्री होत आहे. नोटिशीत नमूद करण्यात आले आहे की, जाहिरातीत वापरण्यात आलेला विमल इलायची हा शब्दप्रयोग अशा प्रकारे सादर करण्यात आला आहे की त्याचा थेट संबंध ‘विमल पान मसाला’ ब्रँडशी जोडला जातो. FDA च्या मते, अशा प्रकारची जाहिरात ग्राहकांची दिशाभूल करू शकते आणि बंदी असलेल्या उत्पादनाच्या ब्रँडची अप्रत्यक्ष किंवा सरोगेट जाहिरात ठरू शकते.

गुटखा आणि इतर बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर कारवाई करणाऱ्या FDA ने या अभिनेत्यांकडून जाहिरात करारांच्या प्रती, मोहिमेची माहिती, मानधनासंबंधी तपशील आणि जाहिरातीपूर्वी करण्यात आलेल्या पडताळणीचे पुरावेही मागितले आहेत. ग्राहक संरक्षण कायद्यांनुसार, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तसेच संबंधित सेलिब्रिटींना तीन वर्षांपर्यंत कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यास बंदी घालण्याची तरतूदही आहे. याचा फटका या कलाकारांना बसू शकतो.