ब्रेकिंग न्यूज

जुन्नर तालुक्यात पिंपळवंडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शेतात नेऊन निर्घृण हत्या 

Share

जुन्नर – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची शेतात नेऊन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडली आहे. घराशेजारीच राहणाऱ्या तरुणाने हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केल्याचे उघडकीस आलं आहे. 

काही दिवसांपूर्वी नसरापूर बलात्कार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. आता पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी येथे घडली आहे. घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची शेतात नेऊन निर्घृण हत्या केली.

या प्रकरणी एका २५ वर्षीय संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पीडित मुलगी मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होती. मुलीच्या शोधासाठी कुटुंबीयांनी आळेफाटा पोलिसात तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीनंतर आळेफाटा पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. असता तपासादरम्यान एका २५ वर्षीय संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास याच गावातील लेंडेस्थळ येथे ओढ्याच्या कडेला एका झाडाजवळ तिचा मृतदेह आढळून आला.

संशयित आरोपी हा पीडितेच्या घराशेजारी राहत होता. ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून शेतात नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली

विशेष म्हणजे, मुलीचा शोध सुरू असताना संशयित आरोपी ग्रामस्थांमध्ये मिसळून पोलिसांसोबत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात सहभागी होत होता. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याच्यावर संशय बळावला आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली.

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण असून, आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.