प्रेमाचा त्रिकोण ! प्रेमप्रकरणातून तरूणावर जीवघेणा हल्ला, पुण्यातील येरवडा भागातील प्रकार
पुणे- माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस ? असा जाब विचारत नवीन प्रियकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने जुन्या प्रियकराला भररस्त्यात गाठलं आणि त्याला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना येरवडा भागातील पुण्यातील गोल्फ क्लब रोडवरील नेताजी चौक परिसरात हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुणाचे पूर्वी एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, त्यानंतर दोघांचे बिनसले आणि त्या तरुणीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, जुन्या प्रियकराने आपल्या प्रेयसीकडे पाहिल्याचा राग नवीन प्रियकराच्या मनात होता. त्याच रागाच्या भरात त्याने साथीदारांना सोबत घेत जुन्या प्रियकराला भररस्त्यात गाठलं. ‘माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस?’ असा त्याला जाब विचारत नवीन प्रियकराने त्याला बेदम मारहाण करून तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नेताजी चौक आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत असून, त्याच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
