नवी दिल्ली – नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) प्रश्नपत्रिकांमधील गंभीर त्रुटी आणि चुकांमुळे यूजीसी-नेट (UGC-NET) जून २०२६ च्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांची परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.
यंदा २२ ते ३० जूनदरम्यान UGC-NET परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेतील इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी आणि परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी या तीन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याची शिफारस समितीने केली.
फेरपरीक्षेचे वेळापत्रक
इंग्रजी (English): ९ सप्टेंबर २०२६,
सकाळी ९:०० ते दुपारी १२:००
वाणिज्य (Commerce): ९ सप्टेंबर २०२६,
दुपारी ३:०० ते संध्याकाळी ६:००
समाजशास्त्र (Sociology): १० सप्टेंबर २०२६,
सकाळी ९:०० ते दुपारी १२:००
फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. तसेच या फेरपरीक्षेचा परिणाम इतर ८४ विषयांच्या निकालावर होणार नाही, त्यांचे निकाल नियमानुसार जाहीर केले जातील.
