ब्रेकिंग न्यूज

रात्री जेवून बेडरूममध्ये गेले आणि… नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाने संपवले आयुष्य

Share

नागपूर- नागपूर शहर एका पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येमुळे हादरले आहे. पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना पोलीस लाईन टाकळी येथील पोलीस क्वार्टरमध्ये मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास घडली.

ज्ञानेश्वर अंकुशराव झोल असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून ते पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अर्ज शाखेत सेवा बजावत होते. ज्ञानेश्वर झोल हे रात्री ड्युटी करून घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसोबत एकत्र जेवण केले. जेवण झाल्यानंतर त्यांची पत्नी मुलांना झोपवण्यासाठी बेडरूममध्ये गेली. त्याच वेळी झोल यांनी साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. पत्नी मुलांना झोपवून बाहेर आली असता, झोल हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच तातडीने झोल यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे झोल यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. झोल यांच्यावर कामाचा काही ताण होता की वैयक्तिक कारणांमुळे ते तणावात होते, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी आकस्मिक निधनाची नोंद केली आहे.

शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच या आत्महत्येमागचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.