ब्रेकिंग न्यूज

विमानतळजवळील नामांकित पबवर पोलिसांची धाड, दोघा मॅनेजरसह 8 जणांना अटक

Share

पुणे- विमानतळ परिसरातील ‘द हौज कम्युन’ या पबवर रविवारी पहाटे तीन वाजता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अचानक छापा टाकून पबमधील दोघा मॅनेजरसह 8 जणांना अटक केली आहे. या पबमध्ये पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने रंगारंग पार्टी सुरू असल्याचे पोलिसांच्या या छाप्यात उघडकीस आले.

सुमित रोहीदास गोटे (वय ३०, रा. येरवडा), नूर हुसेन शेख (वय ३०, रा. विमाननगर), सोनाली विलास पंडित (वय ३२, रा. उंड्री), मंगेश उत्तम धिमधिमे (रा. धानोरी), अनिकेत निवृत्ती मांडकीकीर (वय २१, रा. धानोरी), सुनीता जैन वर्मा (वय २५, रा. लोहगाव), अनंत जगल गायकवाड (वय ३१, रा. खडकी), शाहनूर अमीनुद्दीन काझी (वय ३५, रा. बिबवेवाडी ओटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने पब, बार आणि क्लब सुरू ठेवण्यासाठी रात्री दीड वाजेपर्यंतची अंतिम वेळ निश्चित केली आहे. मात्र या नियमाला धाब्यावर बसवत पबमध्ये पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने पार्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी भल्या पहाटे या पबवर धडक मारली.

पोलीस जेव्हा पबच्या आत शिरले, तेव्हा आतले दृश्य अत्यंत धक्कादायक होते. डीजेच्या दणदणाटावर आणि कर्णकर्कश संगीताच्या तालावर डान्स फ्लोअरवर तब्बल 60 ते 70 तरुण-तरुणी बेभान होऊन नाचत होते. वेळेचे कसलेही भान न ठेवता सुरू असलेल्या या पार्टीतील संगीताचा आवाज पोलिसांनी तातडीने बंद पाडला आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व तरुण-तरुणींना प्राथमिक चौकशीसाठी लागलीच ताब्यात घेतले. पोलिसांनी या सर्व ग्राहकांची तपासणी केली. पबमधील १ लाख ६७ हजार रुपयांची दारु तसेच साऊंड सिस्टीम जप्त केली आहे.

शासनाने दिलेल्या वेळेचे व नियमांचे उल्लंघन करुन व्यवसाय सुरु ठेवणार्‍या हॉटेलमालकासह व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश माने, जीवन माने, तृप्ती सोनवणे यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक पवार, जाधव, दिग्विजय चौगुले, पोलीस अंमलदार सरगर, चव्हाण, मंडलिक, नेवसे, तारु, तुपसुंदर, शिंदे, राठोड, खराडे, साबळे, केगले, रणपिसे, रेणुसे, राठोड, बांदल, शेलार यांनी केली आहे.