ब्रेकिंग न्यूज

पुण्यात लक्ष्मी रोडवर ‘पे अँड पार्क’ योजना लागू करणार, पार्किंगसाठी इतके पैसे मोजावे लागणार

Share

पुणे- पुणे महानगरपालिकेने शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंगच्या समस्येवर तोडगा म्हणून लक्ष्मी रस्त्यावर ‘पे अँड पार्क’ (Pay and Park) योजना लागू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. या निर्णयामुळे आता लक्ष्मी रोडवर खरेदीसाठी किंवा इतर कामांसाठी वाहन पार्क करताना नागरिकांना शुल्क मोजावे लागणार आहे.

लक्ष्मी रोडवर दुकानदार आणि त्यांच्याकडील कर्मचारी वाहने उभी करतात. त्यामुळे ग्राहकांना आपली वाहने उभी करण्यास जागा उपलब्ध होत नाही. त्यातून अनेक वाहनचालक चारचाकी वाहने उभी करून त्यामध्ये बसून असतात. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या रस्त्यावर पे अँड पार्क सुविधा लागू करावी असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाने पुण्यातील सहा रस्त्यावर पे अँड पार्क योजनेसाठी निविदा काढली. यामध्ये जंगली महाराज रस्ता, गोखले रस्ता, लक्ष्मी रस्ता, बिबवेवाडी, बालेवाडी हायस्ट्रीट आणि विमाननगर रस्ता या सहा रस्त्यांचा समावेश आहे. त्यापैकी जंगली महाराज रस्ता, गोखले रस्ता आणि विमाननगर रस्ता या तीन रस्त्यांसाठी प्रत्येकी एका ठेकेदाराने निविदा भरली होती. उर्वरित तीन रस्त्यासाठी एकही निविदा प्राप्त झाली नाही.

त्यानंतर फेरनिविदा काढण्यात आली. त्यामध्ये कमी दराची १ कोटी ७७ लाख ३५ हजार ६४० रुपयांची निविदा निश्चित केली असून, हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या प्रस्तावानुसार, दुचाकी वाहनांसाठी प्रतितास ४ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या सहा रस्त्यांवर एकूण ६,३४४ दुचाकी आणि ६१८ चारचाकी वाहने पार्क करण्याची क्षमता असून, या माध्यमातून पालिकेला वर्षाला सुमारे १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.