ब्रेकिंग न्यूज

हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेदरम्यान विवाहितेचा मृत्यू, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा पतीचा आरोप

Share

शिरूर- दुचाकीवरून पडल्यानंतर हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या २८ वर्षीय विवाहितेचा ऑपरेशनदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरात घडली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप पतीने केला आहे.

पूजा राहुल गई (वय २८, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पूजा यांचे पती राहुल गई यांनी उपचारातील कथित हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

या घटनेची माहिती अशी की, पूजा या मंगळवारी (दि. ४) आपल्या दुचाकीवरून जात असताना पडल्यामुळे त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराजवळ दुखापत झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना बाबूरावनगर येथील एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सीटी स्कॅन आणि एक्स-रेमध्ये फ्रॅक्चर आढळल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.

त्यामुळे पूजा यांना गुरुवारी (दि. ६) सकाळी सुमारे ११ वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. सुमारे तीन तासांनी डॉक्टरांनी बाहेर येऊन पूजा यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. शिरूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचे शवविच्छेदन व अन्य तपासणीतून निष्पन्न झाल्यास संबंधित डॉक्टरांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे. शस्त्रक्रियेदरम्यान उद्भवलेली वैद्यकीय समस्या किंवा अन्य कोणते कारण मृत्यूमागे होते, याचा तपास सुरू आहे. मृत्यूच्या परिस्थितीबाबत संशय व्यक्त करण्यात आल्याने पूजा यांचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात व्हिडिओ रेकॉर्डिंगसह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.