मुंबई- अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याच्या घटनेने मुंबई हादरली आहे. शाळा सुटल्यानंतर १३ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे हात-पाय आणि तोंड बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबईतील माहिम परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १८ जून २०२६ रोजी माहिम येथील कनोसा शाळेजवळ घडली होती. पीडित १३ वर्षीय मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना १६ वर्षांच्या एका अल्पवयीन आरोपीने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. त्याठिकाणी तिचे हात-पाय आणि तोंड बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
या गुन्ह्यात आरोपीसोबत आणखी एक अनोळखी इसमही सहभागी असल्याचा आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे. अत्याचार केल्यानंतर पीडितेचे फोटो एडिट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तिची समाजात बदनामी करण्याची धमकीही आरोपींनी दिली होती. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून माहिम पोलीस ठाण्यात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील अनेक दिवस आरोपींचा त्रास सहन केल्यानंतर पीडित मुलीने अखेर घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तातडीने माहिम पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी भाभा रुग्णालयात पाठवले आहे. माहिम पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
