पुणे- पुण्यातील लोहगाव परिसरात हवाई दलाचा बनावट जवान बनून फिरणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला लोहगाव पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तरुणाकडून हवाई दलातील बनावट ओळखपत्र आणि गणवेश जप्त करण्यात आला आहे.
शुभम विलास अंबुरे (वय २६, सध्या रा. स्वप्ननगरी सोसायटी, शिक्रापूर रस्ता, ता. शिरुर, जि. पुणे) असे या हवाई दलाच्या तोतया तरुणाचे नाव आहे. याबाबत हवाई दलातील जवान ब्रिजेशकुमार मिश्रा (वय ४८) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम अंबुरे याने लोहगावमधील गुरुद्वारा रस्त्यावरील एका दुकानातून हवाई दलाच्या जवानासारखा गणवेश शिवून घेतला होता आणि बनावट ओळखपत्र तयार केले होते. गणवेश परिधान करून परिसरात हिंडत होता. संशयास्पद हालचालींमुळे हवाई दलातील अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली असता त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. अंबुरे याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अंबुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने हवाई दलातील जवानासारखा गणवेश का परिधान केला, तसेच त्याने ओळखपत्र कसे तयार केले ? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक एस शिंंदे तपास करत आहेत.
