मुंबई- अभिनेते राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. आता त्याच्या घरावरही संकट ओढावले आहे. बँकेने त्यांच्या वडिलोपार्जित घरावर जप्ती आणल्यामुळे राजपाल यादव यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.
‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ त्यांच्याकडील थकीत कर्ज वसूल करण्यासाठी त्यांची मालमत्ता लिलावात काढण्याच्या तयारीत आहे. ही मालमत्ता मध्य प्रदेशातील बांदा येथे असून त्याची किंमत 3.10 कोटी रुपये इतकी आहे. वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी बँकेने ‘कचहरी रोड’वरील त्याच्या वडिलोपार्जित घराबाहेर लिलावाची नोटीस लावली आहे. तसेच त्याच्या मालकीच्या आणखी एका जमिनीबाहेरही अशीच नोटीस लावण्यात आली आहे.
आता लिलावासाठी निश्चित केलेली मालमत्ता कर्ज न फेडल्यामुळे ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ने 2024 मध्ये जप्त केली होती. हे 5 कोटी रुपयांचे कर्ज उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील त्याचे वडील नौरंग यादव यांच्या मालकीची मालमत्ता तारण ठेवून घेण्यात आले होते. कर्ज न फेडल्यामुळे थकीत रकमेचा आकडा वाढून 11 कोटी रुपयांवर पोहोचला. त्यानंतर, 8 ऑगस्ट 2024 रोजी बँकेच्या ‘वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स’ शाखेच्या एका पथकाने शाहजहांपूरला भेट देऊन ती मालमत्ता सील केली.
राजपाल यादवची पत्नी राधा यादव आणि आई गोदावरी देवी यांच्या नावेही 16.61 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे आणि त्याची वसुली प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, लिलावासाठी काढण्यात आलेल्या राजपाल यादवच्या मालमत्तांमध्ये केवळ मुंबईतील फ्लॅट्सचाच नाही, तर त्यांच्या ‘कुंद्रा’ या मूळ गावातील जमीन आणि घराचाही समावेश आहे.
