पुणे- सेनापती बापट रस्त्यावरील एका व्यावसायिक प्रकल्पाच्या खोदकामात ३२०० ब्रास अतिरिक्त खोदकाम झाल्याने सुमारे २ कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो अशी भीती कंत्राटदाराला दाखवण्यात आली होती. दंड वाचवण्यासाठी कंत्राटदाराकडे १० लाखांची लाच मागणाऱ्या महिला तलाठी आणि कोतवालाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाठी आश्विनी दत्तात्रय कोकाटे (वय ३७) आणि कोतवाल महेश मधुकर मुंढे (वय ३०) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही शिवाजीनगर तलाठी कार्यालयात कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने खोदकाम ठेकेदार आहेत. त्यांच्या फर्मकडून सर्वे नंबर ९६७ सेनापती बापट रोड या ठिकाणी एका व्यावसायिक प्रकल्पासाठी इमारतीचा पाया खोदण्याचे काम सुरु होते. त्या खोदकामाचा पंचनामा तलाठी अश्विनी कोकाटे यांनी केला. तक्रारदार यांनी ३२०० ब्रास जास्त खोदकाम केले असून त्यावर २ कोटी रुपयांचा दंड बसत असल्याचे सांगितले. हा दंड टाळण्यासाठी तहसीलदारांकडे नील पंचनाम्याची अहवाल सादर करून देण्याच्या बदल्यात अश्विनी कोकाटे यांनी तक्रारदाराकडे १० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
त्यानंतर तक्रारदाराने १५ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केली असता कोकाटे यांनी लाचेची रक्कम कोतवाल महेश मुंढे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. कोकाटे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवुन कोकाटे यांच्या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. पडताळणी मध्ये लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचाही शोध घेण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे यांनी ही कारवाई केली आहे.
