ब्रेकिंग न्यूज

‘हर्षवर्धन सपकाळ जाहीर माफी मागा’, पिंपरी चौकात राष्ट्रवादीची निदर्शने

Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या शब्दावरून राज्यात गदारोळ माजला आहे. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देखील पिंपरी चौकात काँग्रेसच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना योगेश बहल म्हणाले की, स्वर्गीय अजितदादांच्या आकाली जाण्याने जे दुःख वहिनी आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोसळले असताना देखील, केवळ या राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्या सक्रिय झाल्या. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असताना, महाराष्ट्र काँग्रेसने आज वापरलेली “गुंगी गुडिया” ही भाषा केवळ एका कर्तृत्वान महिला नेत्याचा अपमान नाही, तर प्रत्येक कर्तृत्ववान महिलेच्या सन्मानाचा अपमान आहे. ज्या पक्षाच्या इतिहासात इंदिरा गांधींसारख्या मोठ्या नेत्या अशाच शब्दांनी हिणवल्या गेल्या, त्याच पक्षाने आज पुन्हा तीच चूक केली आहे.

महिला सन्मानाच्या घोषणा देण्यापेक्षा स्वतःच्या शब्दांत आणि कृतीमधे तो सन्मान दिसला पाहिजे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अवमान करणारी भाषा कधीच स्वीकारली जाणार नाही. राजकारणात मतभेद असू शकतात, पण महिलांचा अपमान कधीच असू शकत नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या बेताल वक्तव्याचा तसेच पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जे आक्षेपार्ह विधान केलेले आहे, त्वरित हटवून महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, माजी महापौर वैशाली घोडेकर, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष राहुल भोसले, फजल शेख, शाम लांडे, सारंग कामतेकर, युवक अध्यक्ष शेखर काटे, नगरसेविका तथा युवती अध्यक्ष वर्षा जगताप तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.