पिंपरी- सूक्ष्म व लघु उद्योजक तसेच स्टार्टअपसाठी वीज, पाणी, वाहतूक याबरोबरच जागेची सर्वात मोठी अडचण असते. ही समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उद्योगांसाठी आता बहुमजली उत्पादन संकुल उभारण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात हे संकुल उभारण्यात येणार आहे.
औद्योगिक क्षेत्रातील जागांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे एखाद्या नवउद्योजकाला जागा खरेदी करून उत्पादन सुरु करणे अशक्य असते. अशा उद्योजकांना दिलासा मिळावा, उद्योग उभारणीत अडचण निर्माण होऊ नये यासाठी खेड तालुक्यात खराबवाडी येथे सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी बहुमजली उत्पादन संकुल उभारण्यात येणार आहे. संकुलाची उभारणी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाकडून केली जाणार आहे.
या उत्पादन संकुलात वीज, पाणी, वाहतूक व्यवस्था आणि सामायिक सुविधा असणार आहेत. त्यामुळे सूक्ष्म व लघु उद्योजकांना लवकरात लवकर उत्पादन सुरु करता येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण २८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रापासून जवळ असल्याने खराबवाडीची निवड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
खराबवाडीत २ हजार ८०० चौरस मीटर जागेत हे संकुल उभारण्यात येणार आहे. या संकुलासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि अग्निशमन दलाची परवानगी घेण्यात आली आहे. या संकुलाचा आराखडा मंजुरीसाठी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे.
उत्पादन संकुलाची वैशिष्ट्ये
-१९ उद्योगांसाठी पायाभूत सुविधा
-स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती
-एकूण ४२ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित
-भविष्यात उलाढाल १५० कोटी रुपयांवर
