पुणे- पुण्यातील लोहगाव भागात एक भयानक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून भावजयीने दीराच्या ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतले. या गंभीर प्रकारामुळे चिमुकल्याच्या तोंडाला आणि अंतर्गत भागाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तातडीने ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे.
लोहगाव येथील कलवड वस्तीमध्ये ३१ जुलै रोजी सकाळी १२ च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अल्ताफ नबी शेख यांनी लोहगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. लोहगाव पोलिसांनी मुख्य महिला आरोपी सानिया शेख, रियाज इमाम हाल्याळ, (वय ४८, रा. कांदिवली, मुंबई) आणि हाजी मलंग शेख (रा. कांदिवली, मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ शेख व त्यांचा भाऊ लोहगाव येथील कलवड वस्तीमध्ये एकत्र राहतात. त्यांच्यामध्ये घरगुती कारणावरुन वादावादी झाली होती. या जुन्या भांडणाच्या कारणावरुन सानिया शेख हिने अल्ताफ शेख यांच्या ९ महिन्याच्या अली या मुलाच्या तोंडात फेव्ही क्विक टाकले. त्यामुळे या बाळाच्या तोंडात जखमा झाल्या.
मुलाला उलटी झाल्याने हा प्रकार त्याची आई जैनाब शेख हिच्या लक्षात आला. बाळाचे ओठ चिकटल्यासारखे झाल्याने त्या घाबरल्या. त्यांनी तातडीने आपल्या पतीला फोन करुन हे कळविले. त्यांनी बाळाला ससून रुग्णालयात आणले. तेथे त्याच्यावर आयसीयुमध्ये उपचार करण्यात आले. रासायनिक पदार्थ तोंडात गेल्यामुळे मुलाच्या तोंडाची त्वचा आणि आतील भाग भाजला गेला आहे. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्यामुळे बालकाच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत आहे.
फिर्यादी यांची पत्नी जैनाब शेख हिने आरोपी सानिया शेख यांना या प्रकाराचा जाब विचारला असता कोणाला सांगितले तर सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच तिचे नातेवाईक रियाज हाल्याळ, हाजीमलंग शेख हे हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी जैनाब शेख यांना मुलगा व्यवस्थित असून सानिया शेख विरुद्ध तक्रार दिली तर तुला दाखवितो, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लोहगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.
