पुणे – पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या बालिकेची बंडगार्डन पोलिसांनी अत्यंत तत्परतेने अवघ्या १६ तासांत सुखरूप सुटका केली आहे. ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढून दोन महिलांसह तिघांना दौंड येथून अटक केली.
याप्रकरणी पोलिसांनी एका पुरुषासह दोन महिला अशा एकूण तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्रुपदा लक्ष्मण गायकवाड (वय ३५ वर्षे), राधा लकी आदिवासी (वय २० वर्षे), लकी संदिप आदिवासी (वय २१ वर्षे) (सर्व रा. सुंदरनगर, जालना)अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला शिवानी अमोल भोसले (वय २१ वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. मलठण, ता. शिरूर, जि. पुणे) यांचे त्यांच्या पतीसोबत भांडण झाल्यामुळे त्या ३० मे २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपली एक वर्षाची मुलगी ‘लिला’ हिच्यासह पुणे रेल्वे स्टेशन येथे आल्या होत्या. राहण्याची कोणतीही सोय नसल्याने त्यांनी रेल्वे स्थानकातील आरक्षण कार्यालयाजवळील दत्त मंदिरासमोरील मोकळ्या जागेत रात्री मुक्काम केला.
रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास शिवानी यांना अचानक जाग आली, तेव्हा त्यांची मुलगी लीला शेजारी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने त्यांनी तातडीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला. यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासासाठी तातडीने तीन विशेष पथके तयार केली.
या पथकाने ३० मे रोजी रात्री १० वाजेपासून ते ३१ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत सलग १२ तास पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील तब्बल ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. यामध्ये एक संशयित महिला आणि पुरुष बालिकेला घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून सुटणाऱ्या ‘पनवेल-नांदेड-पनवेल’ एक्सप्रेसमध्ये बसत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
संशयित आरोपी रेल्वेने पुढे निघून गेल्याचे समजताच पुणे पोलिसांनी तातडीने रेल्वे मार्गावरील दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, बार्शी व लातूर येथील स्थानिक पोलिसांना हायअलर्ट जारी केला. यानंतर पोलिसांचे विशेष पथक दौंडच्या दिशेने रवाना झाले. ३१ मे रोजी दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौगुले, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे आणि मनोज भोकडे यांच्या पथकाला संशयित आरोपी आढळून आले. पोलिसांनी दौंड रेल्वे स्थानक परिसरात शोध घेऊन तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील बालिकेबाबत विचारणा केली असता, त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनवरून तिला पळवून आणल्याची कबुली दिली.
१६ तासांच्या या थरारानंतर आपली चिमुकली सुखरूप परत मिळाल्याने आई शिवानी भोसले यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पोलिसांनी दाखवलेल्या या धडाकेबाज कामगिरीचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
