फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील तब्बल २८ नगरसेवकांचे पद धोक्यात

पुणे- फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष सरोदे यांच्यासह २८ नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे. या सर्व लोकप्रतिनिधींनी निवडणूक लढवताना शपथपत्रासोबत बनावट कागदपत्रे जोडल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते नितेश गायकवाड यांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसात या प्रकरणाचे अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते नितीन ऊर्फ नीतेश गायकवाड यांनी राज्य निवडणूक आयोग आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना संतोष सरोदे आणि नगरसेवकांनी जोडलेली प्रतिज्ञापत्रे आणि इतर कागदपत्रे बनावट आहेत. निवडणुकीचा अर्ज दाखल करताना नगरसेवकांकडे थकबाकी असतानाही त्यांनी थकबाकी नसल्याचे दाखले सादर केले. काही नगरसेवकांनी स्वत:चे घर असतानाही शपथपत्रात घर नसल्याचे दाखवले आहे.
तसेच काही नगरसेवकांनी थकबाकी असतानाही, त्यांनी थकबाकी नसल्याचे दाखले दिले आहेत. काही नगरसेवकांबाबत अतिक्रमणाच्या आणि अनधिकृत बांधकामाबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. एकाच नगरसेवकाचे नाव दोन विधानसभा मतदारसंघाच्या यादीत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असी मागणी या करण्यात आली आहे. तसेच नगरपरिषदेवर नवीन प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी नीतेश गायकवाड यांनी केली आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून यासंदर्भातील तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने या तक्रारीची दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरपालिका प्रशासन शाखेने फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिगटे यांना पत्र पाठवण्यात आले आहे. तक्रारीसोबत तक्रारदाराने यापूर्वीही या प्रकरणी वारंवार अर्ज केल्याचे या पत्रात म्हटले आहे. या तक्रारीतील सर्व मुद्द्यांची चौकशी करून संबंधित नगरसेवकांकडून खुलासे घेण्याचे आणि चौकशीचा अहवाल तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नगराध्यक्ष संतोष सरोदे यांनी या आरोपांचे खंडन करताना म्हटले आहे की, राजकीय कुरघोडी करण्याच्या उद्देशाने काही जणांकडून अशा खोट्या तक्रारी केल्या जात आहेत. पण संबंधित तक्रारींमध्ये कोणतेही तथ्य नसल्याने त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. यासंदर्भातील आपले खुलासे मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याचेही सरोदे यांनी सांगितले.






