गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुबाडणारा जेरबंद ; स्वारगेट पोलिसांची कामगिरी

गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुबाडणारा जेरबंद ; स्वारगेट पोलिसांची कामगिरी
Share

पुणे – एसटी बसमधील प्रवाशांशी मैत्री करून त्यांना गुंगीच्या गोळ्या देऊन लुटणाऱ्या एका ६३ वर्षीय सराईत गुन्हेगाराला पुणे येथील स्वारगेट पोलिसांनी मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण १ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

बाबू भुरेखान (वय ६३, रा. मंदसौर, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

२० ऑगस्ट २०२६ रोजी बोरिवली ते स्वारगेट दरम्यान धावणाऱ्या शिवशाही बसमध्ये त्याने एका ७९ वर्षीय ज्येष्ठ प्रवाशाला गुंगीची गोळी देऊन त्यांची १० ग्रॅमची सोन्याची अंगठी चोरली होती. या गुन्ह्यामुळे पीडित व्यक्तीची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयू (ICU) मध्ये दाखल करावे लागले होते. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी शिवशाही बसमधील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता आरोपी उज्जैन परिसरात असल्याचे समजताच पोलिसांनी तिथे जाऊन महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याला अटक केली.

गुन्ह्याची पद्धत

आरोपी प्रवासादरम्यान विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष करायचा. गप्पा मारून विश्वास संपादन केल्यानंतर तो त्यांना गुंगीकारक गोळ्या खाण्यातून किंवा पाण्यातून द्यायचा आणि ते बेशुद्ध झाल्यावर त्यांचे दागिने व किंमती ऐवज लुटून पसार व्हायचा.

आरोपीकडे चौकशी केली असता यापूर्वी त्याने रामटेक आणि गुजरात मधील द्वारका येथे देखील अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे कबूल केले. या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पट्टी आणि गुंगी आणणाऱ्या अलप्रॅक्स गोळ्यांची दोन पाकिटे हस्तगत केली आहेत.

या कारवाईत स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक विकास भारमळ, प्रदीप सोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील शेळके आणि त्यांच्या तपास पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

 

Vedh News