सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठाची ३० लाखांची फसवणूक

तळेगाव दाभाडे – व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून एका ५६ वर्षीय नागरिकाची तब्बल २९ लाख ९९ हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी केदार भालचंद्र बापट (५६, कल्पवृक्ष हाऊसिंग सोसायटी, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे, मावळ, पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३ ते १३ ऑक्टोबर दरम्यान घडला. या प्रकरणी आरोपी एस. के. जयस्वाल आणि समाधान पवार अशा दोन जणांविरोधात भा. न्या. सं. कलम आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार सोमवारी (ता. २६) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बापट यांच्या व्हॉट्सॲप नंबरवर एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला. समोरील व्यक्तीने ‘मी सीबीआयमधून तपास अधिकारी एस.के.जयस्वाल बोलतोय,’ अशी बतावणी केली. जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांनी ५३८ कोटी रुपयांची मनी लाँड्रिंग केली असून, या घोटाळ्यात सीबीआयला २४७ बँक खाती सापडली आहेत. या खात्यांपैकी एक खाते बापट यांच्या नावावर असल्याचे सांगून त्यांना या गुन्ह्यात दोषी ठरवून अटक करण्याची तीव्र भीती दाखवण्यात आली.
भीतीच्या दडपणाखाली असलेल्या फिर्यादी बापट यांचा विश्वास संपादन करून, आरोपींनी त्यांच्या पंजाब नॅशनल बँकेतील फिक्स डिपॉझिट आणि म्युच्युअल फंडांची सर्व माहिती काढून घेतली. त्यानंतर ही रक्कम आरटीजीएस करण्यास भाग पाडले. ‘तुमचा युटीआर (UTR) क्रमांक आणि नरेश गोयलचा युटीआर क्रमांक आम्ही तपासणार. तो जुळला तर तुम्ही दोषी ठराल, नाही जुळला तर तुमचे पैसे ७२ तासांत परत मिळतील असे खोटे आश्वासन आरोपींनी दिले.
फिर्यादी बापट यांच्या पंजाब नॅशनल बँक खात्यामधून आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण २९,९९,००० रुपये हस्तांतरित करण्यात आले. पैसे पाठवल्यानंतरही कोणतीही रक्कम परत न मिळाल्याने आणि आरोपींचे फोन बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे बापट यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रवीण कांबळे यांच्या तपास यंत्रणेमार्फत आरोपींचे मोबाईल क्रमांक आणि बँक खाती तपासण्यात येत असून या रकमेपैकी साडेतीन लाख रुपये होल्ड झाल्याची प्राथमिक माहिती आहे.






