‘मी आयुष्य संपवतोय..’! पोलीस अंमलदाराचा मेसेज, पोलिसांची उडाली धावपळ ; पण प्रत्यक्षात….

‘मी आयुष्य संपवतोय..’! पोलीस अंमलदाराचा मेसेज, पोलिसांची उडाली धावपळ ; पण प्रत्यक्षात….
Share

पिंपरी- कामावर गैरहजर राहिल्याचा जाब विचारला म्हणून एका पोलीस अंमलदाराचा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी वाद झाला. त्यानंतर या अंमलदाराने ‘मी आयुष्य संपवतोय..’! असा मेसेज पाठवून पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ उडवून दिली. सर्वांचे धाबे दणाणल्यामुळे त्याचा शोध सुरु झाला. अखेर काही तासांच्या थरारक शोधानंतर हा पोलीस नारायणगाव परिसरातील एका बारमध्ये आयुष्य संपवण्याऐवजी दारू संपवताना आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलीस अंमलदार कामावर गैरहजर होता. या गैरहजेरीबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्याला विचारणा केली असता, दोघांमध्ये सकाळी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या वादविवादानंतर, “वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात आहे,” असा थेट आरोप करत अंमलदाराने आत्महत्येचा इशारा देणारा मेसेज पाठवला आणि बेपत्ता झाला.

काही दिवसांपूर्वीच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या आरटीपीसीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांनी या मेसेजचे गांभीर्य ओळखून त्वरेने संबंधित पोलीस अंमलदाराच्या शोध सुरु केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला असता, संबंधित अंमलदार नारायणगाव परिसरातील एका बारमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने तातडीने तिथे धाव घेतली असता, तो बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत बसलेला आढळून आला. संबंधित पोलीस अंमलदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मानसिक छळाचे जे गंभीर आरोप केले आहेत, त्यांची अधिकृत सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे.

Vedh News