मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा निर्णय

नवी दिल्ली – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नोंदींमध्ये दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार दि. १२ ऑक्टोबर होती. मात्र मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद पहाता निवडणूक आयोगाने पुन्हा या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. आता नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. मात्र अंतिम मतदार यादी मात्र पूर्वीच्या वेळापत्रकानुसार १६ नोव्हेंबर २०२६ रोजी म्हणजेच दिवाळीनंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राज्यात आणि देशाची राजधानी दिल्लीतही सध्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. तसेच एसआयआर (SIR) प्रक्रिया रद्द करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
मतदारांकडून मिळत असलेला अत्यल्प प्रतिसाद पाहता सद्यस्थितीत प्रारूप मतदार यादी अंतिम केल्यास राज्यात लाखों मतदारांची नावे वगळली जातील. त्यातून नवा पेच निर्माण होईल या भीतीने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ८ ऑक्टोबरपर्यंत ७ लाख १९ हजार ३८२ अर्ज प्राप्त झाले आहेत. मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३ लाख ९९ हजार ९२५ अर्ज, तर नावे वगळण्यासाठी १८ हजार ७४८ अर्ज दाखल झाले आहेत.
एक ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार तसेच अन्यथा पात्र असूनही प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना नमुना क्रमांक ६ मधील अर्ज आणि आवश्यक घोषणापत्र भरून नाव नोंदविता येणार आहे.






