कुदळे फाउंडेशनतर्फे तुळजाई फाउंडेशनला ई-स्कूटर भेट

पिंपरी – घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर गौरव “स्त्री”चा या उपक्रमा अंतर्गत कुदळे फाउंडेशनकडून चिखली येथील तुळजाई फाउंडेशनला इलेक्ट्रिक स्कूटर (ई-स्कूटर) भेट देण्यात आली. तुळजाई फाउंडेशनच्या संस्थापिका, सचिव रेखाताई घोडे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
टिंगरेनगर विश्रांतवाडी येथील एअरपोर्ट रोडवर उभारण्यात आलेल्या अेस कुदळे अंपेर शोरूम येथे ग्रीव्हज इंडिया निर्मित अंपेर या स्कुटरच्या च्याव्या घोडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.
या प्रसंगी नगरसेवक सुहास टिंगरे तसेच माजी आमदार आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सुनील टिंगरे उपस्थित होते.
कुदळे फाउंडेशनचे अध्यक्ष नानासाहेब ऊर्फ दीपक कुदळे म्हणाले की, १९३२ पासून कुदळे फाउंडेशन शहरात विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबवत आहे. फाउंडेशनतर्फे आतापर्यंत १७ रुग्णवाहिका देण्यात आल्या असून, समाजहितासाठी अनेक सेवाभावी कार्ये करण्यात आली आहेत.
अेस कुदळेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) नीरज कुदळे म्हणाले, “ऑटोमोबाईल क्षेत्रात आम्ही आजवर एक लाखाहून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे. महिलांच्या उन्नतीसाठी अहोरात्र आणि निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या श्रीमती घोडे यांना मदतीचा हात देण्याची संधी मिळणे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.
समाजाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी घटस्थापनेचा हा शुभमुहूर्त अत्यंत योग्य होता. आपल्या समाजातील या खऱ्या ‘देवींचा’ गौरव करणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”






