नावातील सारखेपणाचा गैरफायदा घेऊन गृहनिर्माण संस्थेची ३ कोटींची फसवणूक

नावातील सारखेपणाचा गैरफायदा घेऊन गृहनिर्माण संस्थेची ३ कोटींची फसवणूक
Share

पिंपरी- नावात असलेल्या साधर्म्याचा गैरफायदा घेत, डीआरडीओ ऑफिसर्स सहकारी गृहनिर्माण संस्थेची मोठी फसवणूक करण्यात आली. या संस्थेच्या मालकीची जमीन दुसऱ्या एका गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर तब्बल ३ कोटी रुपयांना विकली. हा फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार सुस परिसरात उघडकीस आला आहे. या फसवणुकीप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सेवानिवृत्त अधिकारी वीरेंद्र कुमार दिनदयाल वर्मा (रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दादा राम देव ओंकार (डीआरडीओ गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन), रणजित कुमार जदुनाथ सुर (रा. पाषाण), शैलेश रामराव गुरुनुले (सेक्रेटरी, रा. वाकड) याशिवाय एक महिला आणि इतर काही साथीदारांचाही यात समावेश आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी नावात असलेल्या सारखेपणाचा फायदा घेत ही फसवणूक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादींच्या ‘डीआरडीओ ऑफिसर्स सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या’ मालकीची जमीन कोणतीही अधिकृत परवानगी आणि अधिकार नसताना परस्पर अनधिकृतपणे दुसऱ्या व्यक्तींना विकली. ही जमीन गुलाब चांदोरे, मंगेश चांदोरे, संदीप चांदोरे आणि अक्षय चांदोरे यांना विकण्यात आली. याद्वारे सुमारे ३ कोटी रुपयांची आर्थिक अफरातफर आणि फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Vedh News