अचानक तो मालगाडीवर चढला, आणि विजेच्या तारेला स्पर्श करताच…. ; पुण्यात शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरील थरार

अचानक तो मालगाडीवर चढला, आणि विजेच्या तारेला स्पर्श करताच…. ; पुण्यात शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरील थरार
Share

पुणे – पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शिवाजीनगर रेल्वे स्टेशन हादरून गेले. एक तरुण स्थानकात उभ्या असलेल्या मालगाडीवर अचानक चढला. यानंतर कोणाला काही समजण्याच्या आतच त्याने थेट ‘हाय व्होल्टेज’ विजेची तार पकडली. या उच्च दाबाच्या तारेचा इतका भीषण झटका बसला की तरुण थेट खाली फेकला गेला. यात तो गंभीररित्या भाजल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरील मुख्य रेल्वे लाईन्सवर एक मालगाडी उभी होती. यादरम्यान एक तरुण अचानक कसलाही विचार न करता धावत जाऊन रेल्वेवर चढला. त्याने थेट वरची उच्च दाबाची विजेची तार हातात पकडली. तार पकडताच एक प्रचंड मोठा आवाज झाला आणि विजेचा तीव्र झटका बसल्यामुळे तरुण हवेत उडून खाली रेल्वे रुळावर कोसळला.

घटना घडताच रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांनी आणि नागरिकांनी तत्काळ सतर्कता दाखवत या प्रकारची माहिती रेल्वे पोलीस आणि प्रशासनाला दिली. नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणाला उपचारासाठी तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत जखमी झालेल्या या तरुणाची ओळख पटलेली नव्हती. त्याच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या तरुणाच्या अचानक केलेल्या कृत्यामागील कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.

Vedh News