तुळजापूरची ज्योत घेऊन परतताना तीन जीवनज्योती विझल्या ; कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

तुळजापूरची ज्योत घेऊन परतताना तीन जीवनज्योती विझल्या ; कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू
Share

तुळजापूर- तुळजापूर येथून आई तुळजाभवानीची ज्योत घेऊन आपल्या गावाकडे परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसरात ही दुर्घटना घडली.

या भीषण दुर्घटनेत अक्षय राजपूत याचा जागीच मृत्यू झाला तर अमोल औटे आणि गोरख म्हस्कर यांचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शुभम आधाने हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबतची माहिती अशी की खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव आणि जाफ्राबादवाडी येथील काही तरुण आई तुळजाभवानीची ज्योत आणण्यासाठी तुळजापूरला गेले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ज्योत घेत गावाकडे परत येत होते. काही तरुण ज्योत घेऊन धावत होते, तर ज्योतीसाठी तेलाचा पुरवठा करणारे दोघे जण दुचाकीवरून (एमएच २० सीएस ००७४) त्यांच्यासोबत जात होते.

दरम्यान, पिंपळगाव पांढरी परिसरात मागून आलेल्या भरधाव अज्ञात कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कंटेनरने दुचाकीला तब्बल पाच किलोमीटरपर्यंत रस्त्यावरून फरफटत नेले. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी तरुणाला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार कंटेनरचालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Vedh News