आंद्रा धरणातून पिंपरी चिंचवडला पाणी देऊ नका ; आंदर मावळातील ग्रामस्थांची मागणी

तळेगाव दाभाडे- आंद्रा धरणातील पाणी पिंपरी चिंचवड शहराला बंदिस्त वाहिनीद्वारे देण्यास आंदर मावळातील गावकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. आंद्रा धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या सोडवा. भविष्यातील संभाव्य स्थानिक पाणीटंचाईचा मुद्दा लक्षात घ्या अशी मागणी आंदर मावळातील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत तहसीलदार विक्रम देशमुख यांना गुरुवारी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आंद्रा धरणासाठी १९९९ मध्ये आंदर मावळातील टाकवे, वेलज, फळणे, राजपुरी, कोंडीवडे, कशाळ, भोयरे, कल्हाट, पवळेवाडी, निगडे, आवळे, कदमवाडी, घोलपवाडी, शिंदे, शेटेवाडी, मंगळूर आदी गावांतील संपादित जमिनींचा शासनाने अत्यल्प मोबदला दिला. त्याचा वाढीव मोबदला अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
धरणग्रस्तांना जमीन वाटपासाठी शासनाने मावळ व हवेली तालुक्यामध्ये संपादित केलेल्या जमिनीचे वाटप न करता जमिनीवरील शिक्का काढला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना विश्वासात न घेता तळेगाव एमआयडीसी टप्पा क्र. चारसाठी निगडे, आंबळे, पवळेवाडी व कल्हाट या चार गावांत भूसंपादन करण्यात येत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
बाधित गावांचा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा प्रश्न केंद्र शासनाकडे सन २०१७ पासून प्रलंबित आहे. धरण होऊन शासनाला ग्रामस्थांचे प्रश्न सोडवता आलेले नाहीत. प्रकल्पबाधित गावांचे शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजनदेखील आंद्रा धरणातूनच आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने आता आंद्र धरणातून १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पिंपरी-चिंचवड शहरास ग्रामस्थांना विश्वासात न घेता देण्याचा घाट घातला आहे,’’ त्याला वरील सर्व गावातील ग्रामस्थ, शेतकरी, भूमिपुत्रांचा विरोध आहे असा आरोप करण्यात आला आहे. धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या शासनाने बैठक बोलावून प्राधान्याने सोडवाव्यात, अशी ग्रामस्थांची मूळ मागणी आहे.






