नवीन इनोव्हाची स्टंटबाजी अंगलट आली, गाडी जप्त झाली ! आळंदीत कथित महाराजासह रीलस्टारवर गुन्हा दाखल

नवीन इनोव्हाची स्टंटबाजी अंगलट आली, गाडी जप्त झाली ! आळंदीत कथित महाराजासह रीलस्टारवर गुन्हा दाखल
Share

आळंदी – नवीन घेतलेल्या इनोव्हा क्रिस्टा कारमधून स्टंटबाजी करणाऱ्या आळंदी येथील एका कथित महाराजासहित पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बारामती येथील एका रीलस्टारचा समावेश आहे. ही कारवाई आळंदी पोलिसांनी शुक्रवारी (ता. 9) केली.

आळंदीतील कथित महाराज महेश बाळकृष्ण मडके (रा. गोपालपुरा, आळंदी) आणि बारामती येथील रीलस्टार प्रतीक शिंदे यांच्यासह विशाल सातारे (गोपालपुरा, आळंदी), यश मुंगसे (केळगाव) आणि इतर तीन अनोळखी इसम यांचा यामध्ये समावेश आहे. याबाबत फिर्याद पोलीस शिपाई नारायण धनाजी सुरवंशी यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथील महेश मडके याने नवीन चारचाकी वाहन इनोव्हा क्रिस्टा (एमएच 14, एनएस 4501) खरेदी केली होती. त्याच्या आगमनाचा रील्स तयार करण्यासाठी महेश मडके, रीलस्टार प्रतीक शिंदे, विशाल सातारे, यश मुंगसे व इतर तिघांनी केळगाव येथे त्यांच्याकडील चारचाकी वाहन बेदरकारपणे व धोकादायक पद्धतीने चालवून, गोल-गोल फिरवून जीवघेणे स्टंट केले. गाडीचा अचानक वेग कमी जास्त करणे तसेच स्वतःच्या व तेथे जमलेल्या लोकांच्या जिवितास धोका निर्माण केला असे फिर्यादीत नमूद आहे.

याशिवाय कोणतीही परवानगी न घेता ड्रोनद्वारे चित्रीकरण करून सह पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळेच मडके आणि त्याच्या साथीदारांविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून नमूद चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. तसेच स्टंटबाजीसाठी मदत करणाऱ्या तीन काळ्या रंगाच्या गाड्यांच्या चालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vedh News