पुणे शहर बंद करुन दाखवाच! महापौर मंजूषा नागपुरेंचं रोहित पवारांना थेट आव्हान

पुणे- एमपीएससीचे अध्यक्ष डॉ. विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यावरून आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या भूमिकेविरोधात ‘पुणे बंद’चा इशारा दिला आहे. त्यावरून पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी रोहित पवार यांना थेट आव्हान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राजकीय लाभ उठविण्यासाठी पुणे बंदची हाक दिली जात असेल, तर पुणे बंद करून दाखवाच असा इशारा त्यांनी दिला आहे.
रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना पुणे बंद करणार, असे वक्तव्य केल्यानंतर त्याचा समाचार घेताना ‘पुणेकरांचा बाणा वेगळा आहे. तेही रस्त्यावर उतरतील. पुणेकर काय आहेत, हे त्यांना कळेल,’ अशा शब्दांत नागपुरे यांनी पवार यांना प्रत्युत्तर दिले.
आंदोलन करण्याचा विद्यार्थ्यांना पूर्ण अधिकार आहे; मात्र आंदोलनाच्या माध्यमातून पुणेकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून पालक मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना शिक्षणासाठी पुण्यात पाठवितात. पुणेकरांनीही आईच्या मायने या विद्यार्थ्यांना सांभाळले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे राजकीय भांडवल करून शहराचे जनजीवन ठप्प करण्याचा प्रयत्न झाल्यास पुणेकर ते सहन करणार नाहीत, असे महापौर म्हणाल्या.






