मोशीत ४ ऑक्टोबरला स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ला ऐतिहासिक मानवंदना ; घुमणार हजारो ढोल-ताशांचा निनाद

मोशीत ४ ऑक्टोबरला स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ला ऐतिहासिक मानवंदना ; घुमणार हजारो ढोल-ताशांचा निनाद
Share

पिंपरी – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वांत उंच पुतळा असणाऱ्या ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ला ऐतिहासिक मानवंदना देण्याकरिता मोशीत पुन्हा एकदा गगनभेदी ढोल-ताशांचा निनाद घुमणार आहे. हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट (पिंपरी-चिंचवड) आणि ढोल-ताशा महासंघ (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रभरातून हजारो वादक पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल होणार आहेत. अशी माहिती  आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला ढोल-ताशा महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पराग ठाकूर, पुणे अध्यक्ष अक्षय बलकवडे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष विशाल मानकर, हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश महाराज भुजबळ आणि सदस्य प्रशांत वायकर उपस्थित होते.

हा सोहळा रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र’ येथे पार पडणार आहे.

या सोहळ्यासाठी राज्यातील विविध पथकांतील तब्बल ५ हजारांहून अधिक ढोल-ताशा वादकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. विविध पथकांच्या भव्य सामूहिक वादनातून नवीन विश्वविक्रम नोंदवण्याचा आयोजकांचा संकल्प आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येत असलेल्या १२८ मीटर उंच भगव्या ध्वजास (जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज) या सोहळ्यात विशेष मानवंदना देण्यात येणार आहे. या सोहळ्याला शिव-शंभूप्रेमींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Vedh News