‘रोजगार महाकुंभ’ मधून ३२०० युवक युवतींना नोकरीची संधी

पिंपरी- तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देणे, त्यांना कौशल्य आणि नवोपक्रमाच्या बळावर पुढे जाण्यास प्रोत्साहित करणे आणि या युवाशक्तीच्या सहभागातून सक्षम, विकसित राष्ट्र घडवणे, हेच भाजपचे ध्येय आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवी येथे आयोजित ‘रोजगार महाकुंभ – २०२६’ मध्ये ते बोलत होते.
नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित ‘रोजगार महाकुंभ’मध्ये ८ हजार १५७ युवक युवतींनी रोजगारासाठी नोंदणी केली. विविध कंपन्यांमध्ये या युवकांच्या मुलाखती पार पडल्या. यामध्ये ३ हजार २०० हून युवक युवतींना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. काही निवड झालेल्या उमेदवारांना चव्हाण यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तिपत्रे देण्यात आली.
यावेळी महापौर रवि लांडगे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, माजी आमदार अश्विनी जगताप, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, भाजपा सरचिटणीस मधुकर बच्चे, प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या रूपाली देवकर, विद्या गोते यांच्यासह प्रतिष्ठानच्या सदस्या उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, २०१४ नंतर देशाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचार व अडथळे दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. देशाला विकसित भारताच्या दिशेने न्यायचे असेल, तर प्रत्येक नागरिकाने राष्ट्रप्रथम ही भावना ठेवून आपले योगदान दिले पाहिजे. रोजगार मेळावे युवकांना संधी देतात; त्या संधींचे रूपांतर कौशल्य, कष्ट आणि नव्या कल्पनांच्या बळावर प्रगतीत करणे तरुणांच्या हाती आहे, असे त्यांनी सांगितले.






