आळंदी (वेध न्यूज ) :-आळंदी शहरातील श्री भैरवनाथ महाराज चौक येथे आळंदी नगरपरिषद मार्फत ज्ञानेश्वर माऊली व चांगदेव यांच्या भेटीच्या प्रसंगावर आधारित शहराच्या वैभवात भर पाडणारे सुंदर असे शिल्प उभारले आहे.
आळंदी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आळंदीत होत असते. तसेच आषाढी वारी व कार्तिकी निमित्त होणाऱ्या संजीवन समाधी सोहळ्यास राज्य भरातून लाखो वारकरी भाविक आळंदीत दाखल होत असतात. एकूणच वारकरी संप्रदायात आळंदी शहरास अनन्यसाधारण महत्त्व आहे. आळंदी नगरपरिषद प्रशासनाने नेमकी ही बाब ओळखून वारकरी संप्रदाय व माऊलींचा जीवनपट यांच्याशी निगडित गोष्टी या संकल्पनेवर आधारित शिल्प उभारणीचे काम गेल्या काही महिन्यांपासून हाती घेतले आहे. आळंदी नगरपरिषद मार्फत यापूर्वी चाकण चौक येथे सतत कचऱ्याचे ढीग असणाऱ्या व अनधिकृत फ्लेक्स च्या विळख्यात पडलेल्या जागी सुंदर असे तुळशी वृंदावन उभारून त्या जागेच रूप पूर्णपणे बदलून टाकले व हे काम नागरिकांच्या वारकऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरले.
आता आळंदी नगरपरिषदेने आळंदी शहरातील श्री भैरवनाथ महाराज चौक येथे ज्ञानेश्वर माऊली व चांगदेव यांच्या भेटीच्या प्रसंगावर आधारित सुंदर शिल्प उभारले आहे.वारकरी संप्रदायात पवित्र समजल्या जाणाऱ्या विणांचासमावेश,माऊली,त्यांची भावंड,चांगदेव यांचे म्यूनरल,सुंदर रेलिंग,विद्युत रोषणाई यामुळे हे शिल्प आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून नागरिकांकडून या कामाचे कौतुक होत आहे.या शिल्पामुळे चौकाचे सुशोभीकरण होवून शहराच्या वैभवात भर पडली असून वाहतुकीस देखील शिस्त लागणार आहे.

