पुणे- लग्नाच्या अगोदर एकमेकांवर प्रेम केले. लग्न झाल्यावर मात्र पत्नीने पतीचा मानसिक आणि कौटुंबिक छळ सुरु केला. या छळाला कंटाळून लग्नानंतर तीन महिन्यातच पतीने राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले. मुलाच्या आकस्मिक मृत्यूने धक्का बसलेल्या आईने सुनेच्या विरुद्व फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुण्याच्या लोहगाव परिसरात उघडकीस आला आहे.
अविनाश अशोक शेळके (वय ३५, रा. साठे वस्ती, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अविनाशची वृद्ध आई रेखा अशोक शेळके (वय ६३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोहगाव पोलिसांनी आरोपी पत्नी रुबी अविनाश शेळके (वय ३४) हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश आणि रुबी यांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस उलटताच त्यांच्यात क्षुल्लक कारणांवरून कौटुंबिक वाद सुरू झाले. पत्नी रुबी ही अविनाशला मानसिक आणि कौटुंबिक पातळीवर सतत त्रास देत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पत्नीच्या रोजच्या कटकटीला आणि छळाला कंटाळून अखेर नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या अविनाशने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
अविनाशच्या आकस्मिक मृत्यूने धक्का बसलेल्या आईने लोहगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन सून रुबीविरुद्ध फिर्याद दिली. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुबीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहेत.
