ब्रेकिंग न्यूज

पिंपरी-चिंचवडमध्ये २९ सप्टेंबरला बेरोजगारांसाठी भव्य ‘रोजगार महाकुंभ’

Share

पिंपरी- शहरातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे हा रोजगार मेळावा होणार आहे.

या महाकुंभात विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.आमदार उमा खापरे यांच्या विशेष पुढाकाराने तसेच भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाधक्ष अनुप मोरे, माजी उपमहापौर तथा नगरसेवक तुषार हिंगे आणि जयदीप खापरे यांच्या माध्यमातून व ‘युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. विविध सामाजिक संस्थांचेही या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

या रोजगार मेळाव्यात बँकिंग, आयटी, बीपीओ, केपीओ, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या सहभागी होणार आहेत. Axis Bank, ICICI Bank, Tata Motors, Hudas Technology, Wiggle Space, Bajaj आणि Hyundai यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांचे प्रतिनिधी उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. या रोजगार मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे ५ वी पास, १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच इतर पात्र उमेदवारांसाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

महाकुंभात सहभागी होऊनही तात्काळ नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी विशेष ‘जॉब कार्ड’ योजना राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि रोजगाराची गरज यांची माहिती संकलित करून भविष्यातील रोजगाराच्या संधींशी त्यांना जोडले जाणार आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींनी आपली आवश्यक कागदपत्रे आणि अद्ययावत बायोडाटा (Resume) सोबत घेऊन २९ सप्टेंबर रोजी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन अनुप मोरे, तुषार हिंगे आणि जयदीप खापरे यांनी केले आहे.