ब्रेकिंग न्यूज

पोक्सो अंतर्गत दोन खटल्याचा दोन महिन्यात निकाल ; आरोपीना २० वर्षांची सक्तमजुरी

Share

पिंपरी- अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या दोन गंभीर प्रकरणात अवघ्या दोन महिन्यात निकाल आल्यामुळे पीडितांना न्याय मिळाला आहे. एका खटल्यात पिंपरी- चिंचवड येथील विशेष बाल न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षांची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात पिंपरी-चिंचवड जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून २० वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

पहिल्या प्रकरणी पिंपरी- चिंचवड एमआयडीसी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला अटक केली. त्यानंतर आवश्यक पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील अ‍ॅड. स्मिता चौगले यांनी सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. पीडितेची साक्ष, वैद्यकीय अहवाल तसेच तपासादरम्यान पोलिसांनी संकलित केलेले इतर महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले.

सरकारी पक्षाने मांडलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवले आणि त्याला २० वर्षांची सक्तमजुरी तसेच दंडाची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील स्मिता चौगले यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे या खटल्याचा निकाल अवघ्या दोन महिन्यांत लागल्याचे बोलले जात आहे.

शहरात घडलेल्या दुसऱ्या बलात्कार प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये हेमंत कृष्णा तांडेल याच्या विरुद्ध कलम ३७६ तसेच पॉक्सो कायद्यातील कलम ३,४,५ आणि ६ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या गंभीर खटल्यात पिंपरी- चिंचवड जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी केला. न्यायालयीन कामकाजात विशेष सरकारी वकील स्मिता मुकुंद चौगुले यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली. पिंपरी-चिंचवड जिल्हा सत्र न्यायालय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी २१ सप्टेंबर २०२६ रोजी या प्रकरणाचा निकाल दिला. पिंपरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया पार पडली.