ब्रेकिंग न्यूज

पुण्याचा गणेशोत्सव आता टपाल पाकिटावर झळकला ; विशेष टपाल पाकिटाचे पुण्यात प्रकाशन

Share

पुणे – पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला आता आणखी एक ओळख प्राप्त झाली आहे. या परंपरेवर आधारित एका विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन सोमवारी पत्रकार भवन येथे करण्यात आले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार हेमंत रासने, मुख्य पोस्टमास्टर जनरल आर. के. जायभाये यांच्यासह विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

या निमित्ताने पुण्याच्या गणेशोत्सवाचे स्वतंत्र टपाल तिकीट काढण्याची मागणीही मोहोळ यांनी केली. त्यासाठी महापौरांनी पुणे महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक प्रस्ताव आणि कार्यवाही करावी. पुढील वर्ष-दीड वर्षात हे टपाल तिकीट प्रकाशित व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोहोळ म्हणाले, ‘‘लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव रस्त्यावर आणला. त्यानंतर पुण्याच्या गणेशोत्सवाने अनेक स्थित्यंतरे पाहिली. आजही लोकसहभागातून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. त्यामुळे त्याचा सन्मान म्हणून विशेष टपाल आवरण प्रकाशित होणे ही आनंदाची बाब आहे.’

मुख्य पोस्टमास्टर जनरल आर. के. जायभाये म्हणाले, ‘‘मोहोळ यांनी विशेष विनंती केल्यानंतर पुणे रीजनच्या टीमने तत्काळ कार्यवाही करून हे विशेष टपाल पाकीट तयार केले. विशेष टपाल पाकिटे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये प्रदर्शित केली जातात”

महापौर नागपुरे म्हणाल्या की पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाचा वारसा टपाल माध्यमातून जतन करण्याच्या या उपक्रमामुळे उत्सवाच्या परंपरेचा गौरव झाला आहे.