पिंपरी – थेरगाव भागातून जाणाऱ्या प्रस्तावित हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट (HCMTARR) आणि अत्यंत प्रशस्त रस्त्यांच्या आरक्षणाविरोधात नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला. सुनावणीदरम्यान सभागृह नागरिकांच्या गर्दीने तुडुंब भरले होते. तसेच मोशी मधील आरक्षणांना नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास योजना आराखड्यावर (डीपी) दाखल झालेल्या ५६ हजार ७७९ हरकतींपैकी निम्म्याहून अधिक हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित हरकतींवर सोमवारपासून (दि. २१) भोसरी, डुडुळगाव आणि चिखली परिसरासाठी सुनावणी घेण्यात आली असल्याची माहिती नगररचना विभागाने दिली आहे.
आतापर्यंत पिंपरी, तळवडे, थेरगाव, रहाटणी, दिघी, मोशी आणि ताथवडे या सात भागांतील २८ हजार ७२५ हरकतींवर सुनावणी पार पडली आहे.
महापालिकेने १५ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांकडून १४ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार दाखल ५६ हजार ७७९ हरकर्तीवर आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ३ ऑगस्टपासून सात सदस्यीय समितीमार्फत सुनावणी सुरू आहे. यामध्ये अनेक विषयांवर नागरिकांनी एकत्रित व मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवल्या आहेत.
थेरगाव भागातून जाणारा प्रस्तावित एचसीएमटीआर (रिंगरोड) आणि प्रशस्त रस्त्यांच्या आरक्षणाविरोधात नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. या सुनावणीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून सभागृह पूर्ण भरले होते. तसेच मोशी परिसरातील खासगी जागांवर टाकण्यात आलेल्या विविध आरक्षणांवरही मोठ्या संख्येने आक्षेप घेण्यात आले आहेत. समितीकडून प्रत्येक हरकतदाराचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले जात आहे.
सुनावणीची नोटीस मिळूनही गैरहजर राहिलेल्या नागरिकांना सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा एक संधी दिली जाणार आहे. सर्वात शेवटी शासकीय यंत्रणांनी घेतलेल्या हरकतींवर सुनावणी होईल. संपूर्ण प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करून अंतिम मान्यतेसाठी सुधारित आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे नगररचना विभागाने स्पष्ट केले.
