पुणे- महापालिका प्रशासनाने सार्वजनिक वाहनतळ धोरणात मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. नव्या प्रस्तावानुसार रस्त्याबाहेरील पार्किंगसाठी मध्यवर्ती भागातील झोन ‘अ’ आणि उर्वरित परिसर झोन ब म्हणून निश्चित केला जाणार आहे. दोन्ही झोनसाठी दर निश्चित करण्यात आले असून आता पुणेकरांना पार्किंगसाठी जास्त शुल्क मोजावे लागणार आहे.
शहरात दररोज सुमारे १ हजार ते १ हजार ५०० नवीन वाहनांची नोंदणी होत असल्याने पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहराचे सार्वजनिक वाहनतळ धोरण २०१८ मध्ये मंजूर झाले होते. मात्र, सध्याचे पार्किंग शुल्क तुलनेने कमी असल्याने त्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे.
रस्त्यावरील पार्किंगसाठी दुचाकीसाठी २० रुपये, तर चारचाकीसाठी ४० रुपये प्रतितास दर प्रस्तावित करण्यात आला आहे. या दरांना स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतरच त्यांची अंमलबजावणी होणार आहे.
नव्या धोरणात शहराचा मध्यवर्ती आणि दाट वस्तीचा भाग झोन अ, तर उर्वरित परिसर झोन ब म्हणून निश्चित केला जाणार आहे. झोन अ मध्ये दुचाकीसाठी प्रतितास १५ रुपये, तर चारचाकीसाठी ३० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सध्या दुचाकीसाठी १ ते ३ रुपये, तर चारचाकीसाठी ७ ते १४ रुपये शुल्क आकारले जाते. झोन ‘ब’मध्ये दुचाकीसाठी १० रुपये आणि चारचाकीसाठी २० रुपये प्रतितास शुल्क प्रस्तावित आहे. तसेच जागेची कमतरता लक्षात घेऊन मेकॅनिकल पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव असून, येथे चारचाकीसाठी प्रतितास ४० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
रस्त्यावरील पार्किंग धोरणाची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर बालेवाडी हायस्ट्रीट, बिबवेवाडी रोड, विमाननगर रोड, लक्ष्मी रोड आणि जंगली महाराज रोड ते फर्ग्युसन कॉलेज रोड या मार्गांवर केली जाणार आहे. अधिक वेळ पार्किंग केल्यास शुल्क वाढत जाणार असून, कोंडीच्या भागात चारचाकीसाठी पहिल्या तासाला ४० रुपये, तर दहा तासांसाठी ५०० रुपयांपर्यंत शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे.
मेट्रो स्थानकांजवळ मासिक पास
मेट्रोचा वापर वाढविण्यासाठी आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो मार्गिकांजवळील रस्त्याबाहेरील पार्किंगसाठी मासिक पासची सुविधा प्रस्तावित आहे. झोन अमध्ये दुचाकीसाठी १५०० रुपये आणि चारचाकीसाठी ३ हजार रुपये, तर झोन बमध्ये अनुक्रमे १ हजार आणि २ हजार रुपये मासिक शुल्क आकारले जाणार आहे.
