ब्रेकिंग न्यूज

हिंजवडी येथे मूलभूत नागरी सुविधांच्या मागणीसाठी आंदोलन, आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले

Share

पुणे- पुण्यातील हिंजवडी येथे आयटी कर्मचारी आणि हिंजवडी, मान, मारुंजी आणि म्हाळुंगे परिसरातील स्थानिक नागरिकांनी आज रविवारी पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला. यानिमित्ताने हिंजवडीतील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेचा प्रश्न सरकार गांभीर्याने घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या आंदोलनात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. त्याचबरोबर स्थानिक शेतकरी, रहिवासी, रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन माण, हिंजवडी-माण-मारूंजी इन्फ्रा फोरम, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज, हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडंट्स ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड को-ऑप हाऊसिंग फेडरेशन, मुळशी को-ऑप हाऊसिंग फेडरेशन या संघटना सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनाची सुरूवात हिंजवडीतील इन्फोसिस सर्कलपासून झाली. शिवाजी चौकमार्गे पुन्हा इन्फोसिस सर्कल चौकात आल्यानंतर या मोर्चाची सांगता झाली.

रस्त्यांचे भूसंपादनाचे प्रश्न तातडीने निकाली काढावेत, माण-शिवाजीनगर मेट्रो तातडीने सुरू करावी, मुख्यमंत्र्यांनी सर्व शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक हिंजवडीत घ्यावी, हिंजवडी-माण-मारूंजी परिसरासाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करावी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दरमहा आढावा बैठक घ्यावी, वाकड उड्डाणपुलासह भूमकर चौक, पुनावळे, ताथवडे येथील भुयारी मार्गातील वाहतूक कोंडी सोडवावी, मुळशी धरणातून दोन टीएमसी पाण्याचा साठा निश्चित करावा, वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ दुप्पट करावे, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियमितपणे त्रैमासिक आढावा घ्यावा या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनानंतर प्रशासन स्थानिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.