ब्रेकिंग न्यूज

पोलिसांचा व्हाट्सअप मेसेज आणि सोनसाखळी चोर मुक्त, काय आहे प्रकरण ?

Share

पुणे – सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात आरोपीला अटक केल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांना केवळ एक व्हॉट्सॲप मेसेज पाठवून दिली. त्यावर न्यायालयाने आरोपीची अटक बेकायदा ठरवून त्याला तत्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले.

चांदणी चौकात २८ मे २०२५ रोजी घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात बावधन पोलिसांनी धायरी येथील २८ वर्षीय तरुणाला अटक केली. त्याला पौड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने चोरलेले दागिने हस्तगत करायचे असून, त्याच्या साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली.

आरोपीच्या वतीने ॲड. केतनकुमार जाधव आणि ॲड. शुभम बलकावडे यांनी आरोपीची अटक बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित केला. आरोपीला अटक करताना त्याची माहिती व ताब्याचे ठिकाण पोलिसांनी तत्काळ आरोपीचे नातेवाइक किंवा मित्राला कळवावे आणि पोलिस ठाण्यात त्याची नोंद करावी, असे स्पष्टपणे नमूद आहे.

मात्र, पोलिसांनी आरोपीच्या नातेवाइकांना केवळ एक व्हॉट्सॲप मेसेज पाठवून ही माहिती दिली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ४८ अंतर्गत बंधनकारक तरतुदीचे पालन केले नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे ॲड. जाधव यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडी मागणारा अर्ज फेटाळून त्याची अटक बेकायदा ठरवली; तसेच त्याला तातडीने मुक्त करण्याचे आदेश दिले.