पुणे- जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर येथे कार्यरत सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कौस्तुभ नागेश मराठे यांच्या वारजे येथील बंगल्यात १८ ऑगस्ट रोजी पहाटे चोरीचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे, ९ मे रोजी याच बंगल्यात एसीचा कॉम्प्रेसर आणि कॉपर वायर चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली होती.
याबाबतची माहिती अशी की, १८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्याने मुख्य दरवाजा व बाथरूमचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, तसेच खिडकीच्या ग्रीलचा लोखंडी बार कटावणीसदृश हत्याराने कापला. मात्र, शेजारी राहणारे सुशील ढोनसले यांना चोरट्याची चाहूल लागली. त्यांनी आवाज दिल्याने संशयित गेटवरून उडी मारून दुचाकीवरून मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या दिशेने पसार झाला. सुशील ढोनसले यांनी फोनद्वारे मराठे यांना घटनेची माहिती दिली.
त्यानंतर मराठे यांनी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक व्यक्ती मुख्य गेटवरून बंगल्यात प्रवेश करताना दिसत होता. त्यांनी तातडीने १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलिस कर्मचारी कोंढाळकर यांनी पहाटे चारच्या सुमारास घटनास्थळी आले परंतु बंगला बंद असल्याने त्यांना आत प्रवेश करता आला नाही. त्याच दिवशी सायंकाळी वारजे माळवाडी येथील पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहून पुढील कारवाई करू असे सांगितले.
विशेष म्हणजे, ९ मे रोजी याच बंगल्यात एसीचा कॉम्प्रेसर आणि कॉपर वायर चोरीला गेला होता. मे महिन्याच्या घटनेतील आणि १८ ऑगस्टच्या सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती एकच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेज ऑटो डिलीट होण्यापूर्वी ते ताब्यात घेऊन संशयिताच्या वाहनाचा शोध घ्यावा, अशी मागणी मराठे यांनी पोलिसांकडे केली आहे. सध्या नागपूर येथे न्यायालयीन सेवेत असल्याने पुण्यात प्रत्यक्ष येऊन तातडीने फिर्याद देणे शक्य नसल्याचेही त्यांनी पोलिसांना कळविले आहे.
