थरारक ! प्रेयसी गरोदर राहिली, चारित्र्याचा संशय, प्रियकराने शीतपेयामधून डांबराच्या गोळ्या देऊन मारले
मुंबई- चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने आपल्या दोन ते अडीच महिन्यांच्या गरोदर प्रेयसीची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या चेंबूर भागातून समोर आली आहे. शीतपेयामध्ये डांबराच्या गोळ्या मिसळून प्रेयसीला देऊन तिचा जीव घेतला आहे. आरसीएफ पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
आशिष मगर असे या नराधमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ तारखेला मृत महिला आणि तिचा प्रियकर आशिष मगर यांच्यात चारित्र्याच्या संशयातून जोरदार वाद झाला होता. काही वेळाने वाद मिटल्याचे भासवून आशिषने तिला डांबराच्या गोळ्या मिसळलेले शीतपेय पिण्यासाठी दिले. त्या पीडित महिलेने विश्वासाने पेय प्राशन करताच तिला प्रचंड त्रास सुरू झाला आणि अचानक उलट्या होऊ लागल्या.
सुरुवातीला कुटुंबीयांना हा प्रकार सामान्य आजारपणाचा वाटल्याने त्यांनी याकडे दुर्लक्षकेले. परंतु, त्रास वाढून पीडित महिला चक्कर येऊन खाली कोसळली. तेव्हा कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी तिला तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या रुग्णालयाने अधिक उपचारासाठी पीडितेला शताब्दी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मृत्यूपूर्वी पीडित महिलेने प्रियकर आशिषने दिलेल्या शीतपेयानंतरच त्रास सुरू झाल्याची माहिती आपल्या घरच्यांना दिली होती. कुटुंबीयांनी ही संपूर्ण माहिती पोलिसांना दिल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. तपासादरम्यान सुरुवातीला आरोपी आशिषने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने स्वतःच्या गरोदर प्रेयसीची हत्या केल्याची कबुली दिली.
