ब्रेकिंग न्यूज

मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदाची परीक्षा रद्द, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Share

मुंबई- राज्यात आणि देशात परीक्षा घोटाळ्याचे रोज नवनवीन प्रकरणे बाहेर येत असतानाच आता आणखी एक परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी 16 ऑगस्टला झालेल्या ऑनलाईन टायपिंग परीक्षेमध्ये गडबड झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केल्यामुळे अखेर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्यासाठी उच्च न्यायालय प्रशासनाचा निर्णय घेण्यात आला आहे.

लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. ‘सीजेपी’चे अभिजीत दिपके यांनीही संभाजीनगरमध्ये ठिय्या आंदोलन केले होते, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या परीक्षेबाबत आक्षेप घेतला होता. उच्च न्यायालयाचे महानिबंधक मुनगंटे आणि महाधिवक्ता मिलिंद साठे यांची भेट घेऊन त्यांच्याकडं संबंधित परीक्षेची टायपिंग टेस्ट रद्द करण्याची विनंती केली होती. आता ही परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

आता नव्याने टायपिंग टेस्ट घेतली जाणार आहे. नव्या टायपिंग टेस्टची तारीख, ठिकाण आणि वेळ स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. अधिकृत माहितीसाठी उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. झालेल्या परीक्षेतील गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि नव्याने घेण्यात येणारी टायपिंग टेस्ट स्वतंत्र व पारदर्शक पद्धतीने घेतली जावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली.