ब्रेकिंग न्यूज

श्रावणात दारू पिऊन मांसाहार मागणाऱ्या मुलाचा वडिलांनी केला खून 

Share

पुणे – श्रावणात दारु पिऊन येऊन मांसाहारी जेवण मागितल्याने वडिलांनी रागाच्या भरात मारहाण करुन मुलाचा खून केला. ही घटना वारजे माळवाडी येथे २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा ते पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली. हा प्रकार आईने लपवून ठेवल्याचा प्रकार समोर आल्यामुळे आई वडील दोघांनाही अटक करण्यात आली आहे. 

महेश भागवत गायकवाड (वय ३०, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) आणि पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) अशी अटक केलेल्या आईवडिलांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांचा दुसरा मुलगा गणेश भागवत गायकवाड (वय ३४, रा. रामनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश गायकवाड हे पेंटिंगचे काम करतात. त्यांचे आईवडिल व लहान भाऊ महेश गायकवाड शेजारीच वेगवेगळे राहतात. महेश गायकवाड हा काही काम धंदा करत नाही. महेशचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

त्याच्या दारूच्या व्यसनामुळे बायकोने त्याच्यापासून घटस्फोट घेतला होता. महेश दारू पिऊन येतो, या कारणावरुन त्याचे वडिलांबरोबर सतत भांडणे होत होती.

२४ तारखेला रात्री उशिरा महेश दारू पिऊन घरी आला आणि मांसाहारी जेवण देण्यास सांगितले. श्रावण सुरु असल्याने आईवडिल मांसाहार बनवून देत नसल्याने त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. २५ तारखेला पहाटे महेशची आई

फिर्यादी गणेश यांना झोपेतून उठवून महेश हा उठत नाही. त्याचे शरीर पूर्ण थंड पडलेले आहे़ तू बघ जरा त्याला काय झाले आहे़, असे सांगितले. त्यांनी आईबरोबर महेशच्या घरी जाऊन पाहिले. महेश उताणा झोपलेला दिसून आला. त्याला उठवण्यासाठी डोक्याखाली हात घातला असता त्यांच्या हाताला रक्त लागले. तसेच त्याच्या डोक्याला, नाकाला व तोंडाला जखमा झालेल्या दिसत होत्या. गळ्याभोवती व्रण असल्याचे गणेश यांना दिसले. त्यांनी नातेवाईकांना बोलवून घेतले. नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती कळविली. महेशला रुग्णालयात नेले असता तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनात महेशचा मृत्यू श्वसनावरोधामुळे तसेच डोक्याच्या व चेहर्‍यावरील जखमामुळे झाला असल्याचे निष्पन्न झाले.

दारु पिऊन आल्यावर मांसाहारी जेवणावरुन वडिल भागवत गायकवाड व महेश यांच्यात भांडणे झाले असल्याने वडिलांनी त्याला डोक्यावर, तोंडावर मारहाण करुन जखमी केले व गळा दाबुन त्याला जीवे ठार मारले असावे. तसेच झालेला प्रकार हा कसा झाला, हे आई पार्वती व वडिल भागवत गायकवाड यांनी लपवून ठेवला असल्याचे फिर्यादी गणेश गायकवाड यांना वाटत आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश देंडे तपास करीत आहेत.