पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना आता मोफत सॅनिटरी पॅड दिले जाणार आहेत. २६ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या उपक्रमासाठी ७९ लाख ६७ हजार ४८० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महापालिका शाळांमधील इयत्ता ६ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या ११,१९३ मुलींना याचा थेट फायदा होणार आहे.
या योजनेमुळे महापालिका शाळेतील मुलींचे आरोग्य, स्वच्छता आणि शाळांमधील उपस्थिती सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. मुलींच्या स्वच्छतागृहात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यासाठी व्हेंडिंग मशिन्स बसवल्या जाणार असून यासाठी १५ लाख रुपयांची तरतूद आहे.
तसेच वापरलेल्या पॅड्सची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी १८ लाख रुपये खर्चून डिस्पोजल मशिन्स बसवण्यात येणार आहेत. विद्यार्थिनींमध्ये वैयक्तिक स्वच्छता आणि मासिक पाळीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ३.५ लाख रुपयांचा निधी समुपदेशनासाठी राखण्यात आला आहे.
या योजनेमुळे महापालिका शाळेतील मुलींचे आरोग्य, स्वच्छता आणि शाळांमधील उपस्थिती सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.
